Wednesday, February 8, 2012

क्रिस्तोफ वैलिकी

सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर कृत्रिम प्राणवायू शिवाय यशस्वी आरोहण करणारे पीटर हेबलर हिंलायान क्लबच्या यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमासाठी येणार हे कळल्यावर मागीलवर्षी क्रिस्तोफ वैलीकी यांच्याशी झालेला संवाद आठवला. क्रिस्तोफ वैलीकी १४ च्या १४ च्या एटथाऊजंडर (८००० मीटरपेक्षा अधिक उंचीची) हिमशिखरे यशस्वी सर केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. कालच्या पोस्ट मध्ये त्यांनी व्यापारी गिर्यारोहण मोहिमांवर मांडलेले मत होते. त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित त्यांच्या गिर्यारोहण कारकीर्दीवर आधारित हा लेख. 


क्रिस्तोफ वैलीकी
छाया: नंदू धुरंधर

ब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व ८००० मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूर दूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी कोण केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष, शिखर माथा गाठायचा. शिखर सर केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने क्लाईम्बिंग नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता. 
बर हे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून कि काय हा महाशयांनी आणखीन हि काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण होते.  इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोधसेर पण हिवाळ्यात सर केले. 


असे हे जगावेगळे व्यक्तिमत्व नुकतेच दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आल होत. हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) त्यांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभव कथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले. क्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते कि या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर सर केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही कि आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहाणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर  किंवा बेस कॅम्पला करू. कारण डोंगर उतरताना जगात सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी. 


पुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटोन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पला देखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे. त्यामुळेच कि काय पण इलेक्ट्रोनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची नोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही.  कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता. 


व्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. अनेक अपघात, सहका-यांचे डोळ्या देखील मृ त्यु पहिले, मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे सारखे शिकार सर केले.  स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले.  हे सर त्यांना डोंगरची सोबत होती म्हणूनच.  आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंड मध्ये स्वत:ची केटू  स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.


                                                                             *********
दोन्ही लेख / बातम्या लोकसत्ता साठी लिहल्या होत्या, काही कारणास्तव त्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत, पीटर हेबलर यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी उपलब्ध केल्या आहेत. 

No comments:

Post a Comment