Saturday, September 10, 2011


"डोंगराएवढा माणूस"


एका आयुष्यात माणसाने काय काय करायचे... किंबहुना तो काय काय करू शकतो...
करा विचार..
प्रत्येकाला वाटेल अमुक करेल, कोणी म्हणेल तमुक करेल.. कोणी म्हणेल अरे आता तर घर आणि नोकरी सोडून दुसरे काही कोणी करेल का?? 

पण एकाचा वेळी अनेक विषयात गती असणारा..त्या सा-याच विषयावर भरभरून लिहणारा. असा एक माणूस होता...त्या सा-या गोष्टींचा मनस्वी आनंदपण घेणारा होता.. इतकेच नाही तर सहभागी होणारादेखील होता...... हो होता कारण 

प्रो. रमेश देसाई गेले.. 
एका आयुष्यात या माणसाने काय काय करावे 

गिर्यारोहण, पर्यावरण, विज्ञान, संगीत, गोवा मुक्ती संग्राम, पश्चिम घाट बचाव मोहीम वैगरे. या माहितीत आज नव्याने भर पडली ती म्हणजे कामगार चळवळ... म्हणूनच म्हणतो हे मला माहित असलेले... त्याशिवाय आणखीन अजून किती ठिकाणी काय काय योगदान दिले परमेश्वरालाच माहित... .प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन व्यासंग, प्रचंड भटकंती आणि या सर्वामुळे प्रचंड असे अभ्यासू लेखन... अक्षरश: डोंगराएवढे.. पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बरेच छापले गेलंय ..पण मला वाटते अजून तेवढेच छापता येईल इतके लिखाण शिल्लक आहे त्यांचे. 

ट्रेकर्स सह्याद्री 
नकाशा रेखाटन हा तर सरांचा सर्वात महत्वाचा असा पैलू म्हणावा लागेल. तुम्हाला संपूर्ण सह्याद्रीचा ट्रेकर्स नकाशा पहायचा आहे... हे कमी म्हणून कि काय महाराष्ट्रात किल्ले कोठे कोठे आहेत याचा नकाशादेखील सरांनी बनवला...सह्याद्रीतल्या भटक्यांच्या वाटा, घाट रस्ते नोंदवले ते देखील ५० - ६० च्या दशकात.. आजही हे सारे तुम्हाला ट्रेसिंग पेपरवर पाहायला मिळेल.
तेव्हा काहीच नव्हते हो उपलब्ध.. आज काय एका किल्ल्याचे ट्रेकचे नाव टाकले ढिगाने लिंक्स मिळतात..... पण तेव्हा तसली सोय नव्हती.. सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे घ्यायचे आणि डोंगरात जायचे... मग आल्यावर विस्तृत नोंदी.. आजकाल अशा नोंदी दुर्मिळच झाल्यात... उरले आहेत फक्त फेसबुकचे स्टेटस 
असो..

सरांचे मूळ गाव तसे कोकणातले वालावल.. ..
महाविद्यालयीन जीवनात मुंबईत त्यांना अनेक सोबती भेटले १९५३-५५ च्या दरम्यान त्यांची डोंगर भटकंती सुरु झाली. याच दरम्यान विद्यापीठाच्या एक उपक्रमाअंतर्गत कर्जत जवळील एका खेड्यात त्यांनी काही दिवस ठाकर वस्तीत काढले होते. तेथे त्यांनी गिरीजनांशी तर जवळीक साधलीच पण डोंगरांशी देखील... 

हनुमान मोहीम चमू 
१९५३ साली मुंबईतील काही महाविद्यालयातील प्राध्यापक व तरुणांनी मिळून इंटर कॉलेजीएट हायकर्सची स्थापना केली  नंतर त्याला विद्यापीठाची मान्यता मिळून त्याचे रुपांतर "Univercity Hikers & Mountaineers" मध्ये झाले. पुढे गिरीविहार या संस्थेच्या स्थापनेतदेखील त्यांचा महत्वाचा पुढाकार होता. १९६५ साली हनुमान शिखर मोहिमेत सहभाग होता. मिलाम ग्लेशिअर मोहिमेत बरेच संशोधन झाले होते.. तर १९७० साली क्लाईम्बर्स क्लबच्या  बथेरटोली मोहिमेचे ते स्वत: नेते होते....

सह्याद्रीचा तर अभ्यास होताच पण हिमालयाचा चिकित्सक अभ्यास दांडगा होता. परिणामी वृत्तपत्रीय लेखन खूपच होते. जरा विचार करा आज कोणत्याही वृत्तपत्रात इंग्रजी - मराठी गिर्यारोहणावर असे काही पुस्तक परीक्षण खास करून येते का?? पण सरांना तर चक्क टाइम्स ऑफ इंडियानेच सन्मानाने बोलवून खास गिर्यारोहणावरील देश विदेशातील पुस्तकांवर परीक्षण लिहायला सांगतिले होते.. तब्बल दहा वर्षे देसाई सर चिकीत्सक पद्धतीने लिहित होते..

त्यांच्या हिमालयाच्या अभ्यासाची अशीच कथा...१९७० -८० मध्ये युनेस्कोने जगभरातील भूजल साठ्याचा अभ्यास आखला होता. हिमालयातील अभ्यासासाठी निवडलेल्या मोजक्याच भारतीयांमध्ये सरांचा समावेश होता. त्यावर आधारित अनेक अभ्यासू असे लेख त्यांनी वै ज्ञा निक मासिकांमध्ये लिहले होते..

  आयुष्यभर हिमालयाचा संकीर्ण अभ्यास केला.. त्याला संस्कृत साहित्याचादेखील आधार मिळाला.. आणि साकार झाला तो "तिसरा ध्रुव" हा एक मौलिक असा ग्रंथ. उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव आणि तिसरा म्हणजे एव्हरेस्ट .. भारताला लाभलेल्या अनेक नैसर्गिक देणग्यामधील हिमालय हा मुकुटमणी.. याचा सारा पट उलगडला आहे तो तिसरा ध्रुव मध्ये.. या ग्रंथाच्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी सरांच्या अभ्यासाची कल्पना. येते.. हिमालयाचा साद्यंत अभ्यास म्हणजे काय असू शकतो त्याचे हे उदाहरण.. आणि महत्वाचे म्हणजे हे सारे मराठीतून.. खरे तर आपल्याकडे मराठीत असे लिखाण कमीच.. त्यातही इतके अभ्यासू उदाहरण नाहीच.. त्यामुळेच हा ग्रंथ म्हणजे एक मैलाचा दगडच म्हणावा लागेल..
मुळातच हे पुस्तक मिळवून जरूर वाचावे...

असेच काहीसे पर्यावरण बाबतीत..."वाघ आणि माणूस" हे त्यांचे पुस्तक.. पर्यावरण -हासावरील एक उत्तम लिखाण.. या पुस्तकाला ८४-८५ चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला.. खरे हे पुस्तक मला वाचायचे आहे, पण आता झेरॉक्स काढूनच वाचावे लागेल. असेच दुसरे पुस्तक म्हणजे "शिवाजी द लास्ट फोर्ट आर्कीटेक्ट". शिवरायंचे किल्ले इंग्रजीतून देशपातळीवर पोहचविण्याचे महत्वाचे काम याद्वारे झाले. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वाशिवाय सरांना आवड होती ती संगीताची.. अर्थात नुसती आवड बाळगतील ते देसाई सर कसले.. त्यांनी कुंदनलाल सैगलच्या कारकीर्दीचा अभ्यास केला. अगदी सखोल.. सारे संदर्भ मिळवले आणि शब्दबद्ध केले  "सैगलस्वरयुग". आजच कळले या पुस्तकामुळे प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये सैगल प्रेमींचा क्लब तयार झाला, आजतागायत तो सुरु आहे..देसाई सर सोफिया कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे विभाग प्रमुख. पण सरांचे अभ्यासाचे विषय चौफेर. त्यामुळेच अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य.   सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सरांनी सांगलीतील "बळीराजा धरण चळवळ", "पश्चिम घाट बचाव आंदोलन", "गोवा मुक्तीसंग्राम", "कृष्णा परिक्रमा" अशा अनेक चळवळीत प्रत्यक्ष तसेच लिखाणाद्वारे सहभाग घेतला होता. इतके प्रचंड वैविध्य आणि व्यासंग, अनेक विषयावर प्रभुत्व असून देखील प्रसिद्धीपासून दूर असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते.वृत्तपत्रीय लेखनात लेखक म्हणून त्यांचे नाव शेकडो वेळा आले पण त्यांनी स्वत:वर कधीच प्रसिद्धीचा झोत नाही येऊ दिला.. कामगार चळवळीत तर ते खूप मोठे होते.. त्यावर माहिती मिळवून एकदा लिहायला हवे.

स्वभावाने अतिशय मृदू, सामाजिक जाणिवांशी प्रचंड बांधिलकी, अतिशय साधी राहणी आणि कोणीही छोटा मोठा माणूस असो मार्गदर्शनाला तयार.

गिरीमित्र संमेलनातर्फे जीवन गौरव सन्मान देण्याचे ठरले. सरांनी आधी नाहीच म्हणून सांगितले. शेवटी तयार झाले. त्यांची सविस्तर माहिती घेण्यासाठी गेलो.. पूर्वी फोनवर कधी तरी बोलणे झाले होते पण हि पहिलीच भेट..तब्बल ५ तास त्यांच्या घरी होतो..
प्रचंड खजिना होता त्यांच्याकडे... सर एखाद्या तरुणाच्या उत्साहाने सारे सांगत होते.. छोटे छोटे चार्ट, अनेक नोंदी टिप्पणे, कात्रणे, ट्रेसिंग पेपरवरील नकाशे एक ना दोन शेकडो गोष्टी...काय पाहू काय नाही असे झाले..
पुन्हा भेटूया.. असे म्हणून त्या दिवशी निरोप घेतला.. सरांशी माझा तो पहिला आणि शेवटचा संवाद..
संमेलनात भेट झाली पण पुन्हा काही तो खजिना उलगडता आला नाही...


सर वृद्धापकाळाने गेले..
सकाळी गेले, दुपारपर्यंत ब-याच जणांना निरोपपण गेले 
दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होते..
मी, राजन बागवे आणि दिलीप लागू - सरांचे नातेवाईक सोडून आम्ही फक्त तिघेच....
मुंबईच्या धकाधकीत नाही जमत सर्वाना यायला ....
पण या धकाधकीत मला आणखीन एक धक्का बसला 
सर गेल्याचे माहिती मुद्दाम फेसबुकवर टाकली होती...
म्हटले नव्या युगाचे माध्यम ..जगाला लवकर कळेल..
एकालाही सर कोण हेच कळले नाही बहुतेक, किंवा ज्यांना कळले असते ते लोक फेस बुकवर नव्हते..
माहित नाही...

पण असे कसे, इतके मोठे कर्तुत्व आणि नव्या पिढीला हे माहितच नाही... 
अरे आजची सारी माहिती अशी धपाधप मिळते, कोणाला माहितच नाही असे एके काळी कोणीतरी अथक परिश्रम केले आहेत. राजन हळहळला..एवढा  मोठा माणूस. पण आज फक्त आपण १७ च जण शेवटी.. या माणसाचे कर्तुत्व आपणच सांगायला हवे जगाला.. ज्या ज्या वृत्तपत्रांना, वृत्त वाहिन्यांना पाठवता येईल तिकडे बातमी पाठवली...

खरे सांगायचे आताच्या पिढीला खरेच हे सारे माहित नाही... कारण सरांचे कर्तुत्व इंटरनेटवर नाही..
खरे तर माझ्या पहिल्याच ब्लॉगवरील हा पहिलाच लेख..
म्हटले सर जितके मला कळले निदान तितके तरी सांगू जगाला......
जीवन गौरव सन्मान स्वीकारताना - जगदीश नानावटी, रमेश देसाई, सौ  देसाई