Wednesday, August 19, 2015

साहसाची उंची

गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आपल्याकडे तुलनेत उशिरा सुरू झाला असला तरी तो चांगलाच लोकप्रिय आहे. आपली शारीरिक क्षमता अजमावत, निसर्गाची विविध रूपे न्याहाळत एखादा डोंगरमाथा सर करण्याचा आनंद काय असतो, ते तिथे पोहोचल्यावरच समजते.

----------------

उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस पृथ्वीवर अवतरला आणि तेव्हापासूनच माणसाचे आणि साहसाचे नाते जुळत गेले. अज्ञाताच्या शोधाची जिज्ञासा माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच त्याने निरनिराळे धाडसी प्रयोग केले. मग कधी 'किनारा तुला पामराला..' असे गर्वाने सागराला सांगत कोणी समुद्रमार्गे नव्या प्रदेशाच्या शोधात निघाला, तर कोणी छोटय़ाशा विमानातून जगप्रदक्षिणा केली. यातून मानवाच्या साहसाची हौस भागवली गेलीच, पण त्याचबरोबर त्यातून पुढे अनेक साहसी खेळांचा जन्म झाला. भन्नाट साहसी खेळांच्या मालिकेत आजवर आपण आकाशात, पाण्यात, पाण्याखाली संचार केला आहे, तर आता आपल्याला जायचे आहे ते एका अनोख्या वाटेवर, डोंगरयात्रेवर. चार भिंतींच्या बाहेरच्या या जगात तुम्हाला भरपूर तंगडतोड तर करायची आहेच, पण साहसाला साद घालणारे कडे, सुळकेदेखील सर करायचे आहेत. अर्थात हे सारे करीत असताना तुमचा संचार एका अनोख्या विश्वात होणार आहे. हा सगळा प्रकार भरपूर थकवणारा असला तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतरच्या आनंदाची सर कशाशीच करता येत नाही.   


खरे तर सुरुवातीपासूनच डोंगर माणसाचे सखेसोबती राहिले आहेत. त्या शिखराच्या माथ्यावर, त्या डोंगरधारेच्या पलीकडे काय असेल हा विचार माणसाच्या मनात कायम येत राहिला. आपल्या रोजच्या आयुष्यातील कामाच्या निमित्ताने, तर कधी व्यापाराच्या निमित्ताने भरपूर डोंगर भटकंती तो करीत होता. आपली अनेक तीर्थक्षेत्रे तर अशाच उत्तुंग पर्वतांवर विराजमान झालेली. डोंगर भटकंती तर होत असे, पण केवळ जिज्ञासेपोटी अथवा हौस म्हणून असे डोंगर भटकणे हे तसे विरळाच होते. त्याच्या या जिज्ञासेचे रूपांतर साहसी खेळात होण्यासाठी मात्र १५ वे शतक उजाडावे लागले. केवळ एक आनंद म्हणून, हौस म्हणून, साहसी प्रकार म्हणून माणसाने पहिला डोंगर सर केला तो १७८६ मध्ये.
छायाचित्र - शैलभ्रमर 

८ ऑगस्ट १७८६ या दिवशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर माऊंट ब्लाँकवर जाण्याचा मार्ग गॅब्रिएल पॅकार्ड आणि जाक बाल्मा या दोघांनी शोधून काढला. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील पहिली ज्ञात आणि नोंदली गेलेली ही घटना म्हणावी लागेल. त्या दोघांना डोंगरावर जाऊन काही काम करायचे नव्हते तर त्यांना केवळ तो डोंगर चढाई करायची होती. ते तेथे गेले होते ते केवळ परिसराच्या निरीक्षणासाठी. साधनांच्या मदतीने त्या डोंगरावर चढाई-उतराई करणे यामध्ये अंतर्भूत होते. होरेस बेबिडिक्ट द सोस्यूट या शास्त्रज्ञाने उपरोक्त दोघांना यासंदर्भात बक्षीस दिले होते. त्यातून हौसेखातर डोंगर भटकंतीला चालना मिळत गेली. या घटनेमुळे पुढील काळात फक्त शास्त्रीय निरीक्षणे, भूप्रदेशाची माहिती घेणे, सव्‍‌र्हे करणे, व्यापारासाठी प्रवास करणे या उद्देशाबरोबरच केवळ आनंदासाठी गिर्यारोहण हा प्रकार रुजला गेला. पुढे ब्रिटिशांनी आल्प्सच्या पर्वतराजीत १८ व्या शतकात गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार म्हणून विकसित केला. १८५७ मध्ये लंडन अल्पाइन क्लबची स्थापना करून या खेळाची अतिशय भक्कम अशी पायाभरणी त्यांनी केली. अतिशय पद्धतशीरपणे या खेळाची एक चौकट आखून दिली आहे. आनंदासाठी गिर्यारोहण ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे जोपासण्यात त्या पिढीचा मोठा वाटा आहे.

आल्प्सबरोबरच जगाच्या कानाकोपऱ्यात डोंगर भटकंतीचा या साहसी खेळाचा प्रसार झाला. पण त्या सर्वाचा प्रवास येऊन थांबला तो नगाधिराज हिमालयापाशी. सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टपाशी. १९३५ ते १९५३ या वीस वर्षांत हे सर्वोच्च हिमशिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी कंबर कसली होती. तेव्हा भारतात हा खेळ प्राथमिक अवस्थेतदेखील नव्हता. केवळ हिमालयातील शेर्पा मंडळी सोडली तरी गिर्यारोहण हा प्रकार कोणाच्या गावीदेखील नव्हता. भारतात गिर्यारोहणाने मूळ धरले ते एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर.. म्हणजेच १९५३ नंतर.
छायाचित्र - अभिजीत आवळस्कर 

त्यानंतर गेल्या ६० वर्षांत भारतात हा साहसी खेळ चांगलाच रुजला, वाढला आहे. आपल्याकडे गिर्यारोहण चांगल्या प्रकारे विकसित झाले असले तरी गिर्यारोहणाची नेमकी व्याख्या काय, असा प्रश्नच बऱ्याच वेळा पडतो. कारण आजदेखील समाजात गिर्यारोहणाबद्दल अनेक गरसमज खोलवर रुजले आहेत. हे लोक कशाला तडमडायला त्या डोंगरात जातात, काय मिळते त्यांना तेथे जाऊन, नेमके हे करतात काय, दोराला धरूनच तर वर जायचे असते ना, रॅप्लिंग तर आम्हीदेखील केले, त्यात काय एवढे मोठे, असे प्रश्न सर्रास विचारले जातात. म्हणूनच ही संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे.


ढोबळमानाने पाहिले तर या गिर्यारोहणाचे हाइकिंग, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग, स्नो अ‍ॅण्ड आइस क्लाइंबिंग असे टप्पे पडतात. महाराष्ट्रातले ज्येष्ठ गिर्यारोहक आणि अभ्यासक आनंद पाळंदे यांनी 'डोंगरयात्रा' पुस्तकात या सर्व टप्प्याचे अतिशय मार्मिक असे विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, डोंगरयात्रा हा एक स्वायत्त असा क्रीडाप्रकार आहे. त्याचबरोबर तो गिर्यारोहण क्रीडा प्रकाराचा पाया आहे. निश्चित झालेल्या मार्गावरून पायी, स्वावलंबनाचा मंत्र जपत गरजेपुरती सामग्री बाळगत डोंगराळ प्रदेशातून केलेली यात्रा अशी डोंगरयात्रेची सोपी व्याख्या ते करतात. गिर्यारोहक होण्यासाठी आधी उत्तम डोंगरयात्री बनणे आवश्यक आहे.याच पुस्तकात गिर्यारोहणाची संकल्पना विस्तृतपणे पाळंदे सांगतात. साधारणपणे हजार मीटपर्यंत जमिनीच्या वरील उठावास डोंगर म्हटले जाते. यापुढे पर्वत ही संकल्पना आहे. अशा डोंगरावरील एक-दोन दिवसांच्या भटकंती, चढाईला हाइकिंग असे संबोधले जाते. ज्याला आपण पदभ्रमण असे म्हणू शकतो. पण केवळ पदभ्रमण म्हणजे डोंगरयात्रा नव्हे. डोंगररांगातून सलग दोन दिवसांपेक्षा अधिक काळ केल्या जाणाऱ्या भटकंतीला ट्रेकिंग असे संबोधता येईल. ज्याला आपण गिरिभ्रमण असे म्हणू या. अर्थात यामध्ये सारे बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन भटकंती करणे अपेक्षित आहे. 

यापुढचा टप्पा म्हणजे कातळारोहण म्हणजेच रॉक क्लाइंिबग. कातळातील निसर्गत:च उपलब्ध असलेले खाचखळगे, कपारी यांचा वापर करीत अंगभूत कौशल्याच्या आधारे कातळकडय़ांवर चढाई करणे म्हणजेच कातळारोहण. हे दोन प्रकारे केले जाते. जर कोणतेही कृत्रिम साधन न वापरात केवळ अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि नसíगक रचनेच्या बळावर आरोहण केले तर त्यास मुक्त प्रस्तरारोहण म्हटले जाते. पण यामध्येच जर पिटॉन, बोल्ट, एट्रिअर, रोप अशा साधनांचा वापर केला तर त्यालाच कृत्रिम प्रस्तरारोहण म्हटले जाते. अशा आरोहाणात जेथे कोणतीही कपार अथवा खाचखळगा उपलब्ध नसेल अशा वेळेस उपरोक्त साधने वापरून आधार निर्माण केला जातो व पुढील आरोहण केले जाते. अर्थात योग्य मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य व सराव याशिवाय प्रस्तरारोहणामध्ये नपुण्य मिळवणे अशक्य आहे.
छायाचित्र - दिव्येश, राजेश, विनिता 
डोंगरयात्रा व कातळारोहण क्षेत्राशी पुरेशी ओळख झाल्यावर आणि त्यात योग्य ते नपुण्य मिळवल्यावर आपण हिमपर्वत यात्रा म्हणजेच हाय अल्टिटय़ूड ट्रेकिंग प्रकाराकडे वळू शकतो. सर्वसाधारणपणे समुद्रसपाटीपासून तीन ते चार हजार मीटर उंच पर्वतरांगांवर हा क्रीडाप्रकार अनुभवता येऊ शकतो. हा प्रकार साधारण १५ दिवस ते महिनाभर चालू शकतो. या पुढचा टप्पा म्हणजेच हिम-बर्फारोहण. यासाठी मात्र अतिशय तांत्रिक अशा सरावाची, अभ्यासाची, प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. हिमाच्छादित शिखरांवर अंगभूत कौशल्याच्या आधारे आणि विविध साधनांच्या साथीने केलेला हा उपक्रम. गिर्यारोहणातील हा सर्वोच्च असा टप्पा आहे. किंबहुना गिर्यारोहण म्हणजे काय तर गिरी+आरोहण (यामध्ये गिरी म्हणजेच पर्वत आणि अर्थात हिमपर्वत असे अभिप्रेत आहेत). याआधीचे प्रकार हे सर्व याच्या सुरुवातीचे टप्पे आहेत.

पण आजकाल गिर्यारोहणाच्या संकल्पनांबाबत बराच सावळागोंधळ दिसून येतो. हाईकिंगलाच ट्रेकिंग संबोधले जाते. तर काही जण चक्क ट्रॅकिंग असा अप्रस्तुत उच्चार करतात. एखादा प्रस्तर, कातळ आरोहण केल्यानंतर तो जलद उतरण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रॅपिलग. भव्य कॅम्प करून रॅपिलग म्हणजे खूप काही आहे असा समज सर्वत्र पसरविला जात आहे. त्यामुळे सध्या फक्त रॅपिलग म्हणजेच गिर्यारोहण अशी समजूत गेल्या काही वर्षांत झाली आहे. तसेच डोंगरदऱ्यांतून भटकताना, वाटेतील एखादी नदी पार करताना अथवा खूप मोठा सखल भाग जलद ओलांडण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे रिव्हर क्रॉसिंग अथवा व्हॅली क्रॉसिंग. पण सारे काही आधीच तयार असलेल्या साच्यावर शेकडो फुटांचे रिव्हर अथवा व्हॅली क्रॉसिंग करणे म्हणजे गिर्यारोहणात खूप मोठा तीर मारला असा सर्वसामान्यांचा समज झाल्याचे दिसून येते. खरे तर ही सारी गिर्यारोहणाची उपांगे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे सारे म्हणजेच गिर्यारोहण असा समज झाला आहे.

छायाचित्र - संजय लोकरे  
महाराष्ट्राला गिर्यारोहणाची ५५ वर्षांची परंपरा आहे. त्यामध्ये गिर्यारोहणाच्या सर्व टप्प्यांचा अगदी पद्धतशीरपणे विकास झाला आहे. किंबहुना या सर्व टप्प्यांवर अतिशय भरीव कामगिरी येथील डोंगरवेडय़ांनी केली आहे. पण तरीही आज बदलत्या काळाबरोबर यातील संकल्पनांना धक्के बसत आहेत.दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. त्यामुळे त्याला स्वत:चे काही नियम आहेत. वर उल्लेख केलेल्या सर्वच टप्प्यांवर काय करावे, काय करू नये, सोबत काय साधनसामग्री असावी, याबद्दल काटेकोर अशी नियमावली आहे. अगदी पायात कोणते शूज असावेत, कपडे कोणते असावेत, काय खावे, या सर्वाचे नियम आहेत. पण या गिर्यारोहणाला जशी व्यापक प्रसिद्धी मिळत गेली तसेतसे यातील नियम धाब्यावर बसवले जाऊ लागले. कोणीही सोम्या-गोम्या उठावा आणि चार डोकी डोंगरात घेऊन जावीत असा प्रकार घडू लागला.

पदभ्रमण, गिरिभ्रमण, अशा प्राथमिक टप्प्यांवर फार तांत्रिक करामती कराव्या लागत नसल्या तरी त्यांचे ज्ञान असणे अत्यावशक आहे. कारण डोंगरात फिरताना कोणत्या वेळी कोणती परिस्थिती उद्भवणार याची कसलीच पूर्वसूचना देणे शक्य नसते. तर प्रस्तरारोहण व हिम पर्वतारोहण यामध्ये तर तांत्रिक कौशल्य स्वत:ला पूर्णत: अवगत असणे अत्यावश्यक आहे. अर्थात या सर्वासाठी नियमावली उपलब्ध आहे, पण या क्षेत्रातील एकसूत्रीकरणाअभावी त्यांचा योग्य तो प्रसार झालेला नाही. पण गेल्या काही वर्षांतील यातील वाढत्या व्यापारामुळे कसलेही तांत्रिक प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीलादेखील थेट एव्हरेस्ट सर करण्याची हमी मिळू लागली आहे. सह्याद्रीत तर पायात उंच टाचांचे सँडल्स  आणि तंग जीन्स घातलेल्यांनादेखील डोंगर भटकायला नेणारी थोर मंडळी अस्तित्वात आहेत. त्यातूनच गिरिपर्यटक ही एक नवीनच संकल्पना अस्तित्वात आली आहे. पण गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
छायाचित्र - अभिजीत आवळस्कर 

एक लक्षात ठेवावे लागेल की, गिर्यारोहण हा क्रीडाप्रकार असला तरी त्यामध्ये स्पर्धा नाही. खुल्या निसर्गात तुम्ही थेट निसर्गाच्या अधीन असता. तेथे तुमचे शारीरिक कौशल्य आणि सोबतची साधनसामग्री याधारे तुम्हाला डोंगर चढायचा असतो. शिखर सर करायचे असते, मात्र निसर्गाशी स्पर्धा करून नाही तर त्याचा आदर राखून. गिर्यारोहणात काही बाबी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही कोणती आणि किती शिखरे सर केली आहेत, यापेक्षा तुम्ही ते कसे केले आहे हे महत्त्वाचे आहे. शिखर सर करताना तुम्ही काही नवीन तंत्र अवलंबून पाहिले आहे, स्वावलंबन किती होते, की कोणीतरी आखून दिलेल्या वाटेने गेलात, की स्वत: नवीन वाट शोधली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वात तुमच्या आरोहाणाचा किती कस लागला, यावरच तुमच्या गिर्यारोहणाची उंची ठरते. त्यामुळे शिखर किती उंचीचे, याला महत्त्व नाही. त्यापेक्षा आरोहण किती अवघड आहे, यावर येथील श्रेय ठरते. त्यामुळेच एखादे शिखर सर होणार नाही कदाचित, पण गिर्यारोहणाचा आनंद मात्र हमखास मिळवता येईल आणि हा आनंदच यातील परमोच्च बिंदू आहे; शिखराचा माथा नाही.अर्थात डोंगरातली ही भटकंती कितीही खडतर असली तरी, एकदा डोंगरात गेलेला पुन्हा पुन्हा तिकडे जातच राहतो. का जातो? त्यातून त्याला नेमके काय मिळते? त्याबद्दल पुढच्या लेखात.पूर्वप्रसिद्धी - लोकप्रभा Published: Monday, August 12, 2013http://www.loksatta.com/vishesh-news/mountain-climbing-172619/


Sunday, August 19, 2012

डोंगरांनी मला काय दिले ....


डोंगरांनी मला काय दिले ....

निसर्गात स्वच्छंदी भटकायचा आनंद, साहसाची अनुभूती, इतिहासाचे भान, काहीतरी जगावेगळे करयाचा आनंद हे सारे तर दिलेच पण त्यापेक्षादेखील एक अनोखा आनंद दिला तो म्हणजे पाच्छापुरातील वाचनालयाने ....

दिनांक २६ नोव्हेंबर २००५ 
भर दुपारची वेळ..  २५- ३० गावकरी आमची वाट पाहत आहेत..  
१०० - १५० विद्यार्थीदेखील होते...  
खरे तर आम्हाला उशीरच झाला होता...
आम्ही फार मोठे काही करत नव्हतो...
जे आम्हाला हे सुचले होते ते करण्याचा प्रयत्न होता तो.. 
पण त्यांच्या दृष्टीने खूप काही तरी होते.. 
आम्ही पोचणार होतो सकाळी १० वाजता. पण दिवा - सावंतवाडी रेल्वेला अपघात झाला आणि आमची वरात आमच्या एष्टीने १ वाजता पाच्छापुरात पोहचली ....
असे काय होते आमच्याकडे.. 
ज्यासाठी सारी मंडळी वाट पाहत होती.. 

आम्ही सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूरच्या शाळेत एक छोटेसे वाचनालय सुरु करणार होतो.. 
अमुक एवढी पुस्तके वैगरे काही अंदाज नव्हता. एक कल्पना सुचली होती आणि त्याच्या अनुषंगाने काम सुरु केले होते. क्षितिज ग्रुपच्या माध्यमातून सुधागडावर काम करताना जाणवले होते कि गावात देखील काहीतरी केले पाहिजे. इतिहास, गडावरील वास्तू हे सारे तर महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर पायथ्याच्या गावातील गिरीजन देखील तितकेच महत्वाचे आहेत. गावात दोन शाळा आहेत. एक प्राथमिक आणि एक माध्यमिक. माध्यमिक शाळा नुकतीच सुरु झालेली आणि विनाअनुदानित. आपण आजवर ढिगाने पुस्तके वाचली, इतिहासाची, निसर्गाची, ललित, विज्ञान, वैचारिक इ. आपली ऐपत होतीच पण त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे आपल्याला हाताशी अनेक वाचनालयेदेखील होती. मग असेच एक वाचनालय सुरु केले तर. पाली येथील महाविद्यालयातील उपप्राचार्य सुधीर पुराणिक यांच्याशी बोलता बोलता योजना नक्की झाली आणि पाहता पाहता वाचनालयाची संकल्पना अस्तिवात आली होती.  एक दोन आठवड्यात आम्ही सर्वांनी मिळून चार साडेचारशे पुस्तके जमा केली होती. प्रसाद निकतेच्या पुढाकाराने क्षितीज ग्रुपने सुधागडवर अनेक उपक्रम सुरु केलेच होते त्यात आता आणखीन एका नव्या उपक्रमाची भर पडणार होती. 

हे सारे आठवले ते परवाच्या स्वातंत्र्य दिनादिवशी. १५ ऑगस्ट २०१२. 
तब्बल ७ वर्षे झाली होती त्या घटनेला. मध्यंतरी दोन तीन वेळा शाळेत गेलो होतो. वाचनालयाची यादी, नवीन पुस्तके वैगरे, पण नवीन काहीच  झाले नव्हते माझ्याकडून.  तसेही अनेक व्यवधाने मागे लावून घेतल्यामुळे याकडे पाहणे झालेच नव्हते. त्यामुळे ठरवून परवा गेलो. 

अगदी छोट्या स्वरुपात सुरु केलेल्या कामाचे आताचे स्वरूप पाहून खरेच मनापासून आनंद होत होता. 
पाच्छापुरातील अनेक गावकरी, माध्यमिक शाळेतील सारे विद्यार्थी एकत्र आले होते. आदल्या दिवशी क्षितीजच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. मुख्य म्हणजे वाचनालयासाठी भरपूर पुस्तके जमा झाली होती. (नक्की संख्या राहुल सांगू शकेल) महत्वाचे म्हणजे हे काम पुढे चालू राहिले होते. त्या दिवशी राहुल मेश्राम आणि नंदू देवधर सोडले क्षितीजचे इतर सारेचजण माझ्यासाठी नवे होते. ही ब्लॉग पोस्ट लिहण्याचे सर्वात महत्वाचे कारण हेच आहे.

संस्था का हवी?  २००५ साली आम्ही सर्वांनी मिळून हे वाचनालय क्षितीज ग्रुप आणि सेठ जे. एन. पालीवला कॉलेज एनएसएस युनिटच्या माध्यमातून सुरु केले. खरे तर गेल्या ३-४ वर्षात सुरवातीस पुढाकार घेणा-या कोणाचेच याकडे लक्ष नव्हते. तरीदेखील आज ७ वर्षानंतर त्यात अनेक नवीन पुस्तकांची भर पडत आहे. इतकेच नाही तर त्या अनुषंगाने अनेक उपक्रम सुरु आहेत. आज तर ९वी -१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके देखील दिली जात आहेत.  तब्बल १५० हून अधिक. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांची संख्या तर १०००  च्या आसपास पोहचली आहे. हे सारे कसे झाले तर त्याच कारण म्हणजे संस्था. तुम्ही एखादा उपक्रम जेव्हा संस्थेसाठी करता तेव्हा ती संस्थेची जबाबदारी बनते आणि आपोआपच  संस्थेत येणारी पुढची पिढी तो पुढे नेते. नुसताच पुढे नेत नाही तर त्यात आपल्या परीने नाविन्यपूर्ण अशी भर घालते. संस्थेच्या कार्यास हातभार लावते. याचे पुरेपूर प्रत्यंतर मला परवाच्या दिवशी आले. सुरवातीच्या काळातील आम्ही कार्यकर्ते गेली काही वर्षे यात सक्रीय नसलो तरी संस्थेने आपला उपक्रम सोडला नाही. नेटाने प्रयत्न करत नवनवीन पुस्तके यात येत आहेत. इतकेच नाही तर संस्थेमार्फत अनेक स्पर्धादेखील घेतल्या जात आहेत. 

परवाच्या दिवशी त्या सर्व शाळेतील मुलांच्या चेह-यावरील आनंद खूप काही सांगून जात होता. सर्वाना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जात होते. इयत्तावार प्रमाणपत्र वाटत असताना काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तेव्हा त्यांनी नंदूला विचारले. त्याने सांगितले कि पहिल्या तीन क्रमांकाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र शेवटी वाटणार. त्यावेळी त्या मुलांच्या चेह-यावरील आनंद वर्णन करण्यापलीकडचा होता. आपण बक्षीस फार काही मोठे देणार नव्हतो. पण त्यांना खूप आनंद झाला होता. मी तो सारा आंनद त्या मुलांमध्ये बसून अनुभवला. खूप बरे वाटले. एक छोटासा उपक्रम कसा वाढू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण. मी क्षितीज ग्रुपचा सदस्य वैगरे म्हणून नाही सांगत पण संस्था म्हणून एखादा उपक्रम कसा पुढे न्यावा त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे गावातील लोकांचा सहभाग. गेली काही वर्षे दुर्गसंवर्धनाबद्दल बोलताना कायम या मुद्द्यावर भर देत आलोय. नेमका तोच मुद्दा साध्य करण्यासाठी वाचनालयाची सुरवात झाली होती. आज गावातील अनेक मंडळी यामध्ये सहभागी होताना दिसत होती. त्यांना आपल्या संस्थेच्या कामाबद्दल कुतुहूल आणि कृतज्ञता होती. ग्रामस्थ बच्चू कडू सात वर्षापूर्वी वाचनालय सुरु करताना आपल्या बरोबर होता. आज आपले सर्व कार्यकर्ते त्याच्याच घरी उतरले होते. चहा घेताना शाळेतील एक शिक्षक आपण देत असलेल्या पुस्तकांबद्दल तसेच शालेय पुस्तकांबद्दल खूप आभार मानत होते. (त्यांचे मते शालेय सेटसाठी किमान ६५० रुपये खर्च करावे लागतात) . हा सारा सकारात्मक प्रतिसाद भविष्यात खूपच उपयोगी ठरणार आहे. ग्रामस्थांनी आपल्या कामाची नोंद घेतली होती. अर्थात याचा उपयोग भविष्यात नक्की होऊ शकेल..

सुधागडवरील संवर्धनाच्या व पाच्छापुरातील वाचनालयाच्या कार्यरत असणा-या सर्व कार्य कर्त्यांचे अभिनंदन व आभार 

..............................

जाता जाता वाचनालय सुरु करतानाच्या आठवणी:

२००५ साली जेव्हा असे वाचनालय सुरु कार्याचे ठरवले तेव्हा नेमकी कोणती आणि कशी पुस्तके घ्यावी याची माहिती नव्हती. तेव्हा अमेयने  National बुक ट्रस्टची माहिती काढली. तेथून  एक मोठा  बॉक्स भरून तब्बल दोनशे पुस्तके आणली. (अर्थात ती घेताना मी आणि अमेय नेहमीप्रमाणे भरपूर भांडलो). पुराणिक सरांबरोबर पुण्याला जाऊन अनमोल प्रकाशन आणि इतर दुकानातून पुस्तके गोळा केली. हि सारी पुस्तके कॉलेजच्या नावाने घेतली कारण त्यांना सवलत मिळत असे. पुराणिक सरांच्या भावाने देखील मदत केली होती.  त्याचबरोबर अनेक जणांनी यासाठी रोख तसेच पुस्तक स्वरुपात मदत केली.  सुरवातीस घेतलेल्या सर्व पुस्तकांची रजिस्टरमध्ये नोंद पाली कॉलेजच्या ग्रंथपालानी केली होती. पाच्छापुरातील माध्यमिक शाळेतील खंडागळे गुरुजीनी सर्व पुस्तके ठेवण्यासाठी कोठून तरी एक कपाट उपलब्ध केले होते. आज हे खंडागळे सर्व शिक्षा अभियानात पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत, त्यामुळे परवा भेट नाही झाली. वाचनालय सुरु करताना शाळेने आणि गावक-यांनी जंगी कार्यक्रम केला होता. चक्क मांडव वैगरे घातला होता शाळेपुढे. आमचे अगदी हार तुरे घालून स्वागत झाले होते. त्याच वेळी गावात एनएसएसचे शिबीर सुरु होते. ती मुले दुस-या दिवशी गडावर कामाला देखील आली होती. महादरवाजाचे बरेच काम तेव्हा झाले होते. विशेष म्हणजे तेव्हा अप्पा म्हणजेच धनंजय मदन देखील उपस्थित होते. 

(पुण्याहून पुस्तके घेऊन येताना खंडाळा घाटात मस्त चांदणे होते, पुराणिक सरांनी बाईकचा दिवा बंद केला आम्ही त्या नैसर्गिक प्रकाशात बराच घाट उतरलो.) 

डोंगरांनी मला काय दिले याची यादी करायची झाली तर हे वाचनालय हे सर्वोच्च ठिकाणी असेल. 

Wednesday, February 8, 2012

क्रिस्तोफ वैलिकी

सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर कृत्रिम प्राणवायू शिवाय यशस्वी आरोहण करणारे पीटर हेबलर हिंलायान क्लबच्या यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमासाठी येणार हे कळल्यावर मागीलवर्षी क्रिस्तोफ वैलीकी यांच्याशी झालेला संवाद आठवला. क्रिस्तोफ वैलीकी १४ च्या १४ च्या एटथाऊजंडर (८००० मीटरपेक्षा अधिक उंचीची) हिमशिखरे यशस्वी सर केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. कालच्या पोस्ट मध्ये त्यांनी व्यापारी गिर्यारोहण मोहिमांवर मांडलेले मत होते. त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित त्यांच्या गिर्यारोहण कारकीर्दीवर आधारित हा लेख. 


क्रिस्तोफ वैलीकी
छाया: नंदू धुरंधर

ब्रॉड पिक, लोधसे, धौलागिरी, शिशपग्मा, गशेरबर्म, नंगा पर्वत या सर्व ८००० मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर एक आरोहक केवळ एकट्यानेच जातो, दूर दूर लांबवर कोणीही नाही, अपघात झाला तरी कोण केव्हा उपचार करेल माहिती नाही, संदेश पाठवायची प्रगत साधने नाहीत. आहे काय तर फक्त एकच लक्ष, शिखर माथा गाठायचा. शिखर सर केल्याचा आनंद व्यक्त करायचा तो निसर्गाबरोबरच. हे सगळे कोणत्याही चित्रपट शोभेल असे वर्णन आहे प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी यांच्या आजवरच्या थरारक गिर्यारोहण मोहिमांचे. नुसतेच एकट्याने क्लाईम्बिंग नाही तर एकदा बेस कॅम्प सोडला थेट शिखर असे सलग सोळा सतरा तास त्यांनी आरोहण केले आहे तेही पारंपारिक मार्ग न घेता. 
बर हे नुसते एकट्याने आरोहण करणे कमी म्हणून कि काय हा महाशयांनी आणखीन हि काही उद्योग केले. भर हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे ४५ असते, १००-१५० मीटर ताशी वेगाने वारे वाहत असतात, दिवसादेखील बर्फावरून चालणे त्रासदायक असते अशा वेळी चक्क एव्हरेस्टवरच स्वारी केली. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच आरोहण होते.  इतकेच नाही तर पुन्हा कानचेनजुंगा आणि लोधसेर पण हिवाळ्यात सर केले. 


असे हे जगावेगळे व्यक्तिमत्व नुकतेच दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आल होत. हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमानिमित्ताने (२०११) त्यांनी मुंबईतील गिर्यारोह्कांसमोर आपले अनुभव कथन तर केलेच पण थोडे उपदेशाचे डोसदेखील पाजले. क्रिस्तोफ यांचे हे सर्व उद्योग पहिले तर वाटते कि या माणसाचा जन्म डोंगरासाठीच झाला आहे. त्यांच्या हाडामासात गिरीप्रेम भिनले आहे. एकट्याने शिखर सर केल्यावर आनंद कुठे व्यक्त करायचा हा प्रश्न त्यांना कधी पडलाच नाही कि आपण या शिखरावर होतो याचा काही पुरावा गोळा करावा अशी देखील कधी गरज भासली नाही. आनंद व्यक्त करत बसण्यापेक्षा आरोहाणावर जास्तीत जास्त लक्ष कसे केंद्रित करता येईल, यावर सगळा भर. आनंद साजरा करायचा तर घरी गेल्यावर  किंवा बेस कॅम्पला करू. कारण डोंगर उतरताना जगात सर्वात जास्त अपघात झाले आहेत, त्यामुळे ती काळजी आधी. 


पुराव्याचे म्हणाल त्यांनी फक्त नंगा पर्वतवर फोटो काढले आणि तेथे पूर्वी कोणीतरी ठेवलेला एक स्कार्फ आणि पिटोन बरोबर घेतला. याच नंगा पर्वतावर जाताना बेस कॅम्पला देखील कोणी नव्हते. शिखरावरील त्यांची सारी हालचाल खालचे गावकरी मोठ्या दुर्बिणीतून न्याहाळत होते पण क्रिस्तोफना याची कल्पनाच नव्हती. थोडक्यात सारे काही डोंगरासाठीच असेच त्यांचे जीवन आहे. त्यामुळेच कि काय पण इलेक्ट्रोनिक इंजिनिअर झाल्यावर १३ वर्षाची नोकरी चक्क सोडून दिली. महिन्यातून ३ -४ महिने काम करायचे आणि मग बाकी सर्व काळ डोंगरात असे याचे आयुष्य. बर नोक-या तरी कोणत्या केल्या. एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या साहेबाला गाठून मोहिमेसाठी मदत मागायची त्यासाठी त्याच्या उंच उंच इमारतीवर नाव टाकणे, मोठ्या चिमण्यावर नाव टाकणे अशी काही कामे करायची. तो साहेब पण मोहिमेला मदत म्हणून अशी काम उदारपणे द्यायचा. फिशिंग वैगरे अन्य काही अर्थार्जनाचे उद्योग धंदे पण केले. पण सगळा भर तो उंचावर जाण्याचा. क्रीतोफनी आजवर ३० एक मोठ्या मोहिमा केल्या आहेत, छोट्या छोट्या मोहिमांची तर गणतीच नाही.  कधी कधी सोलो क्लाईम्बिंग व हिवाळ्यातील आरोहणावर गिर्यारोहण क्षेत्रातून आक्षेप यायचे. पण क्रिस्तोफ म्हणतात तुमचा अनुभव महत्वाचा त्या जोरावर तुम्ही विश्वास कमवता. स्वत:वर आणि जगावर. डोंगर तर तुमचा सखासोबती असतोच. अतिशहाणणा नसेल तर हे सर्व तुम्ही आरामात करू शकता. 


व्यापारी मोहिमांबाबत देखील त्यांचे मत महत्वाचे आहे. त्या थांबवणे अवघड आहे पण त्यातून गिरीपर्यटक तयार होतात आणि दुसरीकडे गिर्यारोहक घडतो. जो स्वत:च्या आयुष्यातदेखील खूप धैर्याने समोर जातो. स्वत: क्रिस्तोफ तर कधीच डगमगले नाहीत मग ते डोंगर असो कि कुटुंबातील अडचणी. अनेक अपघात, सहका-यांचे डोळ्या देखील मृ त्यु पहिले, मोठ्या अपघातानंतर देखील लोधसे सारखे शिकार सर केले.  स्वत:च विटा रचून स्वत:च घर बांधले.  हे सर त्यांना डोंगरची सोबत होती म्हणूनच.  आज ६१ व्या वर्षी देखील न चुकता दरवर्षी हिमालयात जात असतात. पोलंड मध्ये स्वत:ची केटू  स्पोर्ट नावाची संस्था आहे. हाडाचा गिर्यारोहक कसा असावा याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे.


                                                                             *********
दोन्ही लेख / बातम्या लोकसत्ता साठी लिहल्या होत्या, काही कारणास्तव त्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत, पीटर हेबलर यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी उपलब्ध केल्या आहेत. 

Tuesday, February 7, 2012

गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या...


सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर कृत्रिम प्राणवायू शिवाय यशस्वी आरोहण करणारे पीटर हेबलर हिंलायान क्लबच्या यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमासाठी येणार हे कळल्यावर मागील वर्षी क्रिस्तोफ वैलीकी यांच्याशी झालेला संवाद आठवला. क्रिस्तोफ वैलीकी १४ च्या १४ च्या एटथाऊजंडर (८००० मीटरपेक्षा अधिक उंचीची) हिमशिखरे यशस्वी सर केलेले पाचवे गिर्यारोहक. २०११ मध्ये हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित दोन छोटे लेख. 

   गिरिपर्यटक आणि गिर्यारोहक यामधील फरक जाणून घ्या...         
                       

क्रिस्तोफ वैलिकी -
छाया: नंदू धुरंदर 
"ते सारे 'हाय alititude  टुरिस्टआहेत. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक यामधील फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. एव्हरेस्ट अथवा तत्सम Glamour असलेले शिखर चढून जायचे एवढीच गिरिपर्यटकांची इच्छा असते. त्यापुढे जाऊन डोंगराची आस किती आहे आणि ते पुढे किती अन्य शिखरे सर करतात हा मुद्दा महत्वाचा आहे." जगातील १४ च्या १४ एटथाउजंडर हिमशिखरे सर केलेले प्रसिद्ध गिर्यारोहक क्रिस्तोफ वैलिकी सांगत होते. फेब्रुवारी २०११मध्ये दोन दिवसांच्या भारत भेटीवर ते मुंबईत त्यांच्याशी संवाद साधला. 


मोहिमेचा रूट आधीच तयार केलेलारोप लावलेला आहे,  साधनसामग्रीसाठी, पोर्टर मोठया प्रमाणात आहेत अशा परिस्थिती केलेले गिरिपर्यटन म्हणजे व्यापारी गिर्यारोहण मोहीमतर याच्याबरोबर उलटी परिस्थिती गिर्यारोहकांच्या बाबतीत आढळते असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थातच क्रिस्तोफ यांचे स्वत:चे सारे गिर्यारोहण या दुस-या पद्धीतीने झालेले आहे. सहा एटथाउजंडर हिमशिखरांचे आरोहण करताना तर डोंगरवर ते फक्त एकटेच होते. त्यामुळेच त्याचे हे मत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आजकालच्या व्यापारी तत्वावरील गिर्यारोहण मोहिमांविषयी बोलताना ते म्हणाले, 'डोंगरावर आपण कोणा एकाची मालकी सांगू शकत नाहीपण व्यापारी मोहिमांनी काही तत्वे पाळावीत अशी ते अपेक्षा करतात. हे थांबवणे अवघड आहे. हे गिरिपर्यटक लिहतात तेदेखील फक्त स्वत:च्या बाबतीतत्यामध्ये डोंगर खूप कमी असतो. त्यामुळे या गोष्टीना किती महत्व द्यायचे हा खरा प्रश्न आहे."क्रिस्तोफ यांनी आजवर अनेक गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे सहा एटथाउजंडर हिमशिखरांवर त्यांनी चक्क फक्त एकट्यानेच आरोहण केले आहे. संपूर्ण डोंगरवर फक्त एकच माणूस. कोणी सोबतीला नाहीकाही संदेश द्यायचा तर आजच्या सारखी प्रगत साधने देखील नाहीअशा मोहिमा केल्यावर अर्थातच आजचे व्यापारी वातावरण त्यांना खटकणे स्वाभाविकच. ते स्वत: कधीच त्या वाटेला गेले नाहीत. पण गिर्यारोहकाला Passion असणे महत्वाचे असल्याचे ते सांगतात. व्यापारी मोहिमात नेमकी या Passion चीच कमतरता असते. असे त्यांचे म्हणणे आहे. आजकाल एखादे हिमशिखर चढून गेल्याचे जाहीर केल तर त्यावर पुरावे मागितले जातात. पण क्रिस्तोफ यांना आजवर कधीच कोणी कसलाही पुरावा मागितला नाहीकारण विश्वास. क्रिस्तोफ म्हणतात "तुमचा डोंगरावरचतुमच्या स्वत:वरचाआणि लोकांचा आपल्यावरचा. असे सर्व असेल तर मग कोणतीच गिर्यारोहण मोहीम कठीण नाही. किंबहुना हे सर्व होते म्हणूनच एकट्याने आठ हजारवर मीटरपेक्षा उंच हिमशिखरांवर आरोहण करता कधी भीती जाणवली नाही कधी कोणी त्यावर अविश्वास दाखवला नाही.


क्रिस्तोफ यांनी चक्क कडाक्याच्या हिवाळ्यातदेखील एव्हरेस्टवर आणि त्याहीपेक्षा अवघड अशा केटु या हिमशिखरावर यशस्वी आरोहण केले आहे. असे करणारे ते पहिलेच गिर्यारोहक आहेत. पण असे धोकादायक धाडस करणे कितपत योग्य आहे यावर ते म्हणाले "या सर्वासाठी तुम्हाला प्रचंड अनुभवाची गरज आहे. भरपूर सराव आणि डोंगराशी मैत्री तुम्हाला हे बळ देवू शकते आणि त्यातूनच मग असे विश्वविक्रम होवू शकतात. नेमके आज याचा अभाव असल्याचे त्यांना जाणवते. अर्थातच  आजकाल करिअर मुळे तरुणांना एवढा वेळ देणे देखील शक्य नसल्याचेदेखील ते मान्य करतात. क्रिस्तोफ यांनी २०११ च्या हिमालयन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात गिर्यारोहण विषयक विशेष व्याखाने दिली होती. 

                                      ********

दोन्ही लेख / बातम्या लोकसत्ता साठी लिहल्या होत्या, काही कारणास्तव त्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत, पीटर हेबलर यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी उपलब्ध केल्या आहेत. 

Saturday, September 10, 2011


"डोंगराएवढा माणूस"


एका आयुष्यात माणसाने काय काय करायचे... किंबहुना तो काय काय करू शकतो...
करा विचार..
प्रत्येकाला वाटेल अमुक करेल, कोणी म्हणेल तमुक करेल.. कोणी म्हणेल अरे आता तर घर आणि नोकरी सोडून दुसरे काही कोणी करेल का?? 

पण एकाचा वेळी अनेक विषयात गती असणारा..त्या सा-याच विषयावर भरभरून लिहणारा. असा एक माणूस होता...त्या सा-या गोष्टींचा मनस्वी आनंदपण घेणारा होता.. इतकेच नाही तर सहभागी होणारादेखील होता...... हो होता कारण 

प्रो. रमेश देसाई गेले.. 
एका आयुष्यात या माणसाने काय काय करावे 

गिर्यारोहण, पर्यावरण, विज्ञान, संगीत, गोवा मुक्ती संग्राम, पश्चिम घाट बचाव मोहीम वैगरे. या माहितीत आज नव्याने भर पडली ती म्हणजे कामगार चळवळ... म्हणूनच म्हणतो हे मला माहित असलेले... त्याशिवाय आणखीन अजून किती ठिकाणी काय काय योगदान दिले परमेश्वरालाच माहित... .प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन व्यासंग, प्रचंड भटकंती आणि या सर्वामुळे प्रचंड असे अभ्यासू लेखन... अक्षरश: डोंगराएवढे.. पुस्तकांच्या, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बरेच छापले गेलंय ..पण मला वाटते अजून तेवढेच छापता येईल इतके लिखाण शिल्लक आहे त्यांचे. 

ट्रेकर्स सह्याद्री 
नकाशा रेखाटन हा तर सरांचा सर्वात महत्वाचा असा पैलू म्हणावा लागेल. तुम्हाला संपूर्ण सह्याद्रीचा ट्रेकर्स नकाशा पहायचा आहे... हे कमी म्हणून कि काय महाराष्ट्रात किल्ले कोठे कोठे आहेत याचा नकाशादेखील सरांनी बनवला...सह्याद्रीतल्या भटक्यांच्या वाटा, घाट रस्ते नोंदवले ते देखील ५० - ६० च्या दशकात.. आजही हे सारे तुम्हाला ट्रेसिंग पेपरवर पाहायला मिळेल.
तेव्हा काहीच नव्हते हो उपलब्ध.. आज काय एका किल्ल्याचे ट्रेकचे नाव टाकले ढिगाने लिंक्स मिळतात..... पण तेव्हा तसली सोय नव्हती.. सर्व्हे ऑफ इंडियाचे नकाशे घ्यायचे आणि डोंगरात जायचे... मग आल्यावर विस्तृत नोंदी.. आजकाल अशा नोंदी दुर्मिळच झाल्यात... उरले आहेत फक्त फेसबुकचे स्टेटस 
असो..

सरांचे मूळ गाव तसे कोकणातले वालावल.. ..
महाविद्यालयीन जीवनात मुंबईत त्यांना अनेक सोबती भेटले १९५३-५५ च्या दरम्यान त्यांची डोंगर भटकंती सुरु झाली. याच दरम्यान विद्यापीठाच्या एक उपक्रमाअंतर्गत कर्जत जवळील एका खेड्यात त्यांनी काही दिवस ठाकर वस्तीत काढले होते. तेथे त्यांनी गिरीजनांशी तर जवळीक साधलीच पण डोंगरांशी देखील... 

हनुमान मोहीम चमू 
१९५३ साली मुंबईतील काही महाविद्यालयातील प्राध्यापक व तरुणांनी मिळून इंटर कॉलेजीएट हायकर्सची स्थापना केली  नंतर त्याला विद्यापीठाची मान्यता मिळून त्याचे रुपांतर "Univercity Hikers & Mountaineers" मध्ये झाले. पुढे गिरीविहार या संस्थेच्या स्थापनेतदेखील त्यांचा महत्वाचा पुढाकार होता. १९६५ साली हनुमान शिखर मोहिमेत सहभाग होता. मिलाम ग्लेशिअर मोहिमेत बरेच संशोधन झाले होते.. तर १९७० साली क्लाईम्बर्स क्लबच्या  बथेरटोली मोहिमेचे ते स्वत: नेते होते....

सह्याद्रीचा तर अभ्यास होताच पण हिमालयाचा चिकित्सक अभ्यास दांडगा होता. परिणामी वृत्तपत्रीय लेखन खूपच होते. जरा विचार करा आज कोणत्याही वृत्तपत्रात इंग्रजी - मराठी गिर्यारोहणावर असे काही पुस्तक परीक्षण खास करून येते का?? पण सरांना तर चक्क टाइम्स ऑफ इंडियानेच सन्मानाने बोलवून खास गिर्यारोहणावरील देश विदेशातील पुस्तकांवर परीक्षण लिहायला सांगतिले होते.. तब्बल दहा वर्षे देसाई सर चिकीत्सक पद्धतीने लिहित होते..

त्यांच्या हिमालयाच्या अभ्यासाची अशीच कथा...१९७० -८० मध्ये युनेस्कोने जगभरातील भूजल साठ्याचा अभ्यास आखला होता. हिमालयातील अभ्यासासाठी निवडलेल्या मोजक्याच भारतीयांमध्ये सरांचा समावेश होता. त्यावर आधारित अनेक अभ्यासू असे लेख त्यांनी वै ज्ञा निक मासिकांमध्ये लिहले होते..

  आयुष्यभर हिमालयाचा संकीर्ण अभ्यास केला.. त्याला संस्कृत साहित्याचादेखील आधार मिळाला.. आणि साकार झाला तो "तिसरा ध्रुव" हा एक मौलिक असा ग्रंथ. उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव आणि तिसरा म्हणजे एव्हरेस्ट .. भारताला लाभलेल्या अनेक नैसर्गिक देणग्यामधील हिमालय हा मुकुटमणी.. याचा सारा पट उलगडला आहे तो तिसरा ध्रुव मध्ये.. या ग्रंथाच्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी सरांच्या अभ्यासाची कल्पना. येते.. हिमालयाचा साद्यंत अभ्यास म्हणजे काय असू शकतो त्याचे हे उदाहरण.. आणि महत्वाचे म्हणजे हे सारे मराठीतून.. खरे तर आपल्याकडे मराठीत असे लिखाण कमीच.. त्यातही इतके अभ्यासू उदाहरण नाहीच.. त्यामुळेच हा ग्रंथ म्हणजे एक मैलाचा दगडच म्हणावा लागेल..
मुळातच हे पुस्तक मिळवून जरूर वाचावे...

असेच काहीसे पर्यावरण बाबतीत..."वाघ आणि माणूस" हे त्यांचे पुस्तक.. पर्यावरण -हासावरील एक उत्तम लिखाण.. या पुस्तकाला ८४-८५ चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला.. खरे हे पुस्तक मला वाचायचे आहे, पण आता झेरॉक्स काढूनच वाचावे लागेल. असेच दुसरे पुस्तक म्हणजे "शिवाजी द लास्ट फोर्ट आर्कीटेक्ट". शिवरायंचे किल्ले इंग्रजीतून देशपातळीवर पोहचविण्याचे महत्वाचे काम याद्वारे झाले. 

वर उल्लेख केल्याप्रमाणे या सर्वाशिवाय सरांना आवड होती ती संगीताची.. अर्थात नुसती आवड बाळगतील ते देसाई सर कसले.. त्यांनी कुंदनलाल सैगलच्या कारकीर्दीचा अभ्यास केला. अगदी सखोल.. सारे संदर्भ मिळवले आणि शब्दबद्ध केले  "सैगलस्वरयुग". आजच कळले या पुस्तकामुळे प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये सैगल प्रेमींचा क्लब तयार झाला, आजतागायत तो सुरु आहे..देसाई सर सोफिया कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे विभाग प्रमुख. पण सरांचे अभ्यासाचे विषय चौफेर. त्यामुळेच अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य.   सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सरांनी सांगलीतील "बळीराजा धरण चळवळ", "पश्चिम घाट बचाव आंदोलन", "गोवा मुक्तीसंग्राम", "कृष्णा परिक्रमा" अशा अनेक चळवळीत प्रत्यक्ष तसेच लिखाणाद्वारे सहभाग घेतला होता. इतके प्रचंड वैविध्य आणि व्यासंग, अनेक विषयावर प्रभुत्व असून देखील प्रसिद्धीपासून दूर असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते.वृत्तपत्रीय लेखनात लेखक म्हणून त्यांचे नाव शेकडो वेळा आले पण त्यांनी स्वत:वर कधीच प्रसिद्धीचा झोत नाही येऊ दिला.. कामगार चळवळीत तर ते खूप मोठे होते.. त्यावर माहिती मिळवून एकदा लिहायला हवे.

स्वभावाने अतिशय मृदू, सामाजिक जाणिवांशी प्रचंड बांधिलकी, अतिशय साधी राहणी आणि कोणीही छोटा मोठा माणूस असो मार्गदर्शनाला तयार.

गिरीमित्र संमेलनातर्फे जीवन गौरव सन्मान देण्याचे ठरले. सरांनी आधी नाहीच म्हणून सांगितले. शेवटी तयार झाले. त्यांची सविस्तर माहिती घेण्यासाठी गेलो.. पूर्वी फोनवर कधी तरी बोलणे झाले होते पण हि पहिलीच भेट..तब्बल ५ तास त्यांच्या घरी होतो..
प्रचंड खजिना होता त्यांच्याकडे... सर एखाद्या तरुणाच्या उत्साहाने सारे सांगत होते.. छोटे छोटे चार्ट, अनेक नोंदी टिप्पणे, कात्रणे, ट्रेसिंग पेपरवरील नकाशे एक ना दोन शेकडो गोष्टी...काय पाहू काय नाही असे झाले..
पुन्हा भेटूया.. असे म्हणून त्या दिवशी निरोप घेतला.. सरांशी माझा तो पहिला आणि शेवटचा संवाद..
संमेलनात भेट झाली पण पुन्हा काही तो खजिना उलगडता आला नाही...


सर वृद्धापकाळाने गेले..
सकाळी गेले, दुपारपर्यंत ब-याच जणांना निरोपपण गेले 
दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार होते..
मी, राजन बागवे आणि दिलीप लागू - सरांचे नातेवाईक सोडून आम्ही फक्त तिघेच....
मुंबईच्या धकाधकीत नाही जमत सर्वाना यायला ....
पण या धकाधकीत मला आणखीन एक धक्का बसला 
सर गेल्याचे माहिती मुद्दाम फेसबुकवर टाकली होती...
म्हटले नव्या युगाचे माध्यम ..जगाला लवकर कळेल..
एकालाही सर कोण हेच कळले नाही बहुतेक, किंवा ज्यांना कळले असते ते लोक फेस बुकवर नव्हते..
माहित नाही...

पण असे कसे, इतके मोठे कर्तुत्व आणि नव्या पिढीला हे माहितच नाही... 
अरे आजची सारी माहिती अशी धपाधप मिळते, कोणाला माहितच नाही असे एके काळी कोणीतरी अथक परिश्रम केले आहेत. राजन हळहळला..एवढा  मोठा माणूस. पण आज फक्त आपण १७ च जण शेवटी.. या माणसाचे कर्तुत्व आपणच सांगायला हवे जगाला.. ज्या ज्या वृत्तपत्रांना, वृत्त वाहिन्यांना पाठवता येईल तिकडे बातमी पाठवली...

खरे सांगायचे आताच्या पिढीला खरेच हे सारे माहित नाही... कारण सरांचे कर्तुत्व इंटरनेटवर नाही..
खरे तर माझ्या पहिल्याच ब्लॉगवरील हा पहिलाच लेख..
म्हटले सर जितके मला कळले निदान तितके तरी सांगू जगाला......
जीवन गौरव सन्मान स्वीकारताना - जगदीश नानावटी, रमेश देसाई, सौ  देसाई