Sunday, August 11, 2019

हरहुन्नरी मुकेश

हरहुन्नरी मुकेश

यावर्षी गिरिमित्र संमेलनाचा समारोप थोडासा उशिराच झाला. दोन दिवसाची झोप अनावर होऊन मी संध्याकाळी चार वाजताच व्यासपीठाच्या मागे असलेल्या खोलीत झोपलो होतो. पुढे समारोपानंतर ग्रुप फोटो वगैरे सुरु होते, त्यातलाच एक फोटो संमेलनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडला आणि पुढच्या क्षणाला मुकेशचा फोन आला. मी झोपेतच फोन घेतला, मुकेश बोलू लागला, ‘झोपालास ना दमून, मला माहित होतं! फोटो पाहीला तेव्हाच लक्षात आले.’ त्यावेळी तो हॉस्पिटलमधून होता. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. पण त्याचा जीव गिरिमित्र संमेलनात अडकला होता. त्याच आस्थेतून त्याने फोन केला होता. त्याला माहीत होतं की, मी मागच्या वेळेप्रमाणेच दमून झोपलो असणार. यावर्षी संमेलनाची जबाबदारी त्यानेच सुरु केलेल्या अणुशक्ती केंद्राच्या गिरिसंचार संस्थेकडे होती. इतकं वर्षे आम्ही सर्वजण संमेलनात एकत्र आहोत, नेमकं यावर्षी त्याला येता येणार नव्हते. पण त्याचा जीव डोंगरमित्रांमध्ये अडकला होता, आणि आता तर तो सर्वानाच मागे ठेऊन निघून गेलाय.

डोंगरात ज्याच्याबरोबर भटकतो त्याच्याबरोबर एक अव्यक्त नातं निर्माण होतं. तेथे वयाचा, अनुभवाचा अडसर उरत नाही. थेट एकेरी हाक मारत सलगी साधली जाते. पण डोंगरात न भटकतासुद्धा, डोंगर हा सामाइक घटक असलेल्या माणसांशीदेखील असेच नाते जडते. मुकेशबरोबर माझं नातं असंच काहीसं होतं. गेल्या 15 वर्षापासूनची त्याची ओळख. एक ना दोन अनेक उद्योग एकत्रपणे केले. डोंगरात कधीच आम्ही एकत्र गेलो नाही. पण डोंगर हा आमच्यामधला असा धागा होता की कोणत्याही औपचारिकतेचे कसलंही बंधन आमच्यामध्ये आलं नाही. किंबहुना ते मुकेशने येऊच दिलं नाही, हे त्याचं मोठेपण.

देशातील पहिल्या नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिमेतील तो महत्वाचा आरोहक सदस्य, युथ होस्टेल महाराष्ट्राचा सचिव, युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य, गिर्यारोहण महासंघाचा पदाधिकारी आणि एनपीसीएल या भारत सरकारच्या एका प्रतिष्ठित उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी. पण ही अधिकारांची, मानाची झूल त्याने कधीच पांघरली नाही. त्यामुळे आमच्या वयात 15 एक वर्षांचे अंतर असले तरी कधीही त्याचे दडपण आले नाही.

गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने मुकेशची ओळख वाढली असली तरी त्यापूर्वी 2003 मध्ये तो आमच्या क्षितिज ग्रुपच्या एका कार्यक्रमासाठी आला होता. पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेच्या सादरीकरणासाठी तो डोंबिवलीत आला होता. आम्ही आपले हौशी कलाकार, नुकतेच डोंगरात भटकू लागलो होतो. हृषीकेशला विचारले तर त्याने मुकेशला सीडी घेऊन पाठवले. साधासरळ स्वभाव, कसलीही आढ्यता नाही की एव्हरेस्टवर 25 हजार फूट उंचीपर्यंत आरोहण केल्याचा कसलाही गर्व नाही. अतिशय शांतपणे आमच्या बालीश प्रश्नांना त्याने उत्तरदेखील दिली. लोकल ट्रेनने आला आणि लोकल ट्रेनने निघून गेला. एव्हरेस्टची अशी त्याने किमान 500 सादरीकरणे केली होती.

पुढे संमेलनाच्या कामामुळे ओळख वाढली, त्याबरोबर आमचे अनेक उपक्रम सुरु होतेच. बऱ्याचवेळा मिटिंगसाठी आम्ही युथ होस्टेलच्या कार्यालयात भेटायचो. मुकेशची ओळख होत गेली ती येथेच. दिवसभर ऑफीसचे काम उरकून तो आठवड्यातून दोन दिवस तरी येथे यायचाच. हृषी आणि मुकेशने मिळून युथ होस्टेलच्या कामाचा विस्तार करायला सुरुवात केली होती. वेगवेगळे उपक्रम सुरु केले होते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये भटकंती असो की अंदमानची भटकंती. किमान खर्चात केले जाणारे हे उपक्रम राज्य शाखेचे कार्यालय आर्थिकदृष्ट्या सुरळीत ठेवण्यासाठी उपयोगी पडायचे. मुकेश सतत नियोजन, व्यवस्थापनात गर्क. जोडीला तेथील कर्मचारी वर्ग होताच. हृषी आणि मुकेश दोघेही युथ होस्टेलच्या राष्ट्रीय कार्यकारणीतदेखील होते. राष्ट्रीय पातळीवर चांगलेच राजकारण रंगते. त्यात महाराष्ट्र राज्य शाखेची प्रगती अनेकांना खुपायची. मुकेश अनेकदा म्हणायचा, आपण आवाज उठवायला हवा. हृषी मध्यममार्गी आणि उपक्रम पुढे नेण्यात अधिक स्वारस्य असणारा. मुकेश आवाज उठवायला हवा म्हणायाचा, पण त्याचा पिंड राजकारण करणारा नव्हता. किंबहुना या दोघांनाही इंटरेस्ट होता तो डोंगरात नवनवं काही तरी करता यावं यातचं. आणि त्या दोघांनी त्यादृष्टीनेच कैक वर्षे खस्ता खाल्या. त्याचेच मूर्त स्वरुप युथ होस्टेलच्या अनेक अभिनव उपक्रमात सदैव दिसून येते.

 गिरिमित्र संमेलन हे वार्षिक निमित्त होतं, पण गेल्या पंधरा वर्षात अनेक छोटेमोठे उपक्रम संयुक्तपणे वेगवेगळ्या संस्थांना एकत्र आणून सुरुच होते. त्या सर्वांमध्ये मुकेश हक्काचा माणूस होता. हा कधीच चिडलेला, त्रस्त झालेला, वैतागलेला पाहिला नाही. बरं याला कोणत्याही कामाचा कमीपणा वाटला नाही. मीपण त्याला काहीही सांगायचो, आणि तो ते करायचा. त्याच कारण एकच होतं, आपण सारेचजण संस्थेसाठी काम करतो ही धारणा महत्वाची होती. मग लहानथोर हा भेदच उरायचा नाही. तसाही त्याला कोणताही अभिनिवेश कधीच नव्हता.

संमेलनाच्या या साऱ्या गदारोळात कधी कधी मोकळा वेळ मिळायचा तेव्हा इतर गप्पा व्हायच्या. मग कधी जुन्या आठवणी निघायाच्या. त्यातून मग बरंच काही नवंनव उलगडत जायचं. गिर्यारोहणा क्षेत्रात तो अशा काळात होता की तेव्हा महाराष्ट्रातील संस्थात्मक पातळीवरील गिर्यारोहणाचा सुर्वणकाळ होता. सतत काही ना काही तरी नवीन घडत असायचं. व्यापारीकरणाची लागण झालेली नव्हती, त्यामुळे प्रत्येक संस्था जोमाने वाढत होती. मुकेशने तो काळ अनुभवला होता. त्याच काळात झालेली भारतातील पहिली नागरी यशस्वी एव्हरेस्ट मोहिम तो जगला होता. असं बरंच काही गप्पातून उलगडत जायचं.

दोन एक वर्षापूर्वी प्रसाद गोगटे, मी आणि मुकेश अशा तिघांनी मिळून एक उद्योग केला. हृषीकेशच्या एकसष्ठीनिमित्ताने एक पुस्तक करायचं आम्ही ठरवलं. हे हृषीला कळू द्यायचं नव्हतं त्यामुळे कधी माझ्या घरी, कधी बाहेर कुठेतरी अशा आमच्या भेटीगाठी सुरु झाल्या. शेवटच्या टप्प्यात पुस्तकाचं डिझाईन वगैरे सुरु झालं तेव्हा मुकेश, प्रसाद, अभिजीत रणदीवे असे माझ्या घरी पडीकच असायचे. त्याला डिझाईन, लेखन या बाबतीत फारसं काही लक्षं नसायचं, पण संपूर्ण काम वेळेत होतंय की नाही, फोटो कोणते हवेत, कोणाकडून लेख यायचा बाकीआहे, छपाईला वेळेत जाणार का, छापून केव्हा येणार याचं सारं गणित तो सांभाळत होता. त्याचवेळी लोकप्रभाच्या दिवाळी अंकाचं कामदेखील घाईगडबडीत होतं. पण मुकेशची धावपळ आमच्या वरताण होती. माझ्या हातात वेळ कमी आहे हे त्याला माहित असल्याने टेस्ट प्रिंट करणे, ते आणून मला दाखवणे, त्यातील प्रूफ रिडींगच्या दुरुस्त्या करवून घेणे असं सारं तो अगदी मनापासून करत होता. पुस्तक छापायाला जाण्यापूर्वीदेखील त्याने पुन्हा एकदा टेस्ट प्रिंट काढून मला घरी आणून दिली, पुन्हा एकदा नजर मारण्यासाठी म्हणून. त्या पुस्तकासाठी त्याला मी एक लेख लिहायला लावला होता. त्याला लिखाणाचं अंग आहे की नाही याची मला कसलीच कल्पना नव्हती. पण विषय एव्हरेस्ट मोहिमेचा होता. त्यामुळे तोच योग्य माणूस होता. त्याने भला मोठा लेख लिहला. तो टाइप करुनदेखील दिला. एव्हरेस्ट मोहिमेच्या अगदी बारीकसारीक खाचाखोचा त्यामध्ये आल्या होत्या. मला संपादकीय संस्कार करण्यासाठी फारसे श्रमदेखील घ्यावे लागले नाहीत. कारण त्याने जे काही लिहलं होतं ते सर्व त्याने अनुभवलं होतं.

त्याची आणि हृषीची एव्हरेस्टनंतरची वाटचाल एकत्रच झाली. अशावेळी श्रेयापश्रयावरुन कधीकधी इगो दुखावला जाऊ शकतो. एकाच क्षेत्रात असून थोडं कमी मानाचं पद मिळालं की त्याची खंत भल्याभल्यांना पोखरुन टाकते. त्यातूनच मग फाटे फुटु लागतात अशी उदाहरण आपल्याकडे बरीच आहेत, पण मुकेशच्या मनाला ही भावना कधीच शिवली नाही. किंबहुना त्याला जे उत्तम करता यायचं ते ते सर्व तो अगदी जीव ओतून करत राहीला. तेदेखील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मग ते युथ होस्टेल असो, गिरिसंचार असो, दुर्गविकास असो, गिरिमित्र असो की अखिल।महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे काम असो की अन्य काही. मुकेश सतत संस्थेसाठी, उद्दीष्टांसाठीच कार्यरत राहीला.
आपल्याकडे असलेले रिसोर्सेस संस्थेच्या कामास यावे ही त्याची भावना कायम राहीली. गिरिमित्र संमेलनामध्ये दरवर्षी काही ना बदल होत असतो. सुरुवातीची कैक वर्षे आम्ही साधा कापडी पडदा वापरायचो. एकेवर्षी यात बदल करुया अशी चर्चा सुरु झाली. एकदोन बैठकांमध्ये त्याबद्दल माहिती मिळवली. पण खर्चाचे गणित जमत नव्हते. शेवटी एका बैठकीत मुकेशच त्याच्या माहितीतल्या एका व्हेंडरशी बोलला. त्याच्याकडून खर्चाचा अंदाज घेतला, संमेलनाला किती खर्च परवडणार ते पाहीले आणि समोरच्या माणसाला सांगितले एवढेच मिळतील. त्यावर्षी पहिल्यांदा तो भव्य असा एलसीडी स्क्रीन व्यासपीठावर उभा राहीला. संमेलनाचा सारा लूकच त्यामुळे बदलून गेला. मुकेशने शांतपणे हे काम मार्गी लावले होते. कोणताही अभिनिवेश न बाळगता काम करणाऱ्यांची हल्ली कमी होत जाणारी संख्या पाहता मुकेशचे वेगळेपण उठून दिसते. इतकेच नाही तर तो संस्थेच्या कामात तुमच्या वैयक्तिक मतांचादेखील आदर करतो. आपलंच खरं म्हणून कधी रेटत नाही.

मागच्या वर्षी त्याची तब्येत ढासळू लागली. एनपीसीएलच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलमध्ये तो अडमिट झाला. आजाराचे निदान होत नव्हते. तसा तो एकदम ठणठणीत आणि फिट अण्ड फाईन माणूस. कसलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. दरवर्षी पंढरपूरच्या वारीत त्याची आरोग्य पथकाबरोबरची फेरी ठरलेली. पण अति देवदेव करणाऱ्यातला देखील नव्हता. अखेरीस एनपीसीएलच्या आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर कर्करोगावरील उपचार सुरु झाले. त्याची इच्छाशक्ती जबर होती. त्यामुळे या प्रक्रियेत कधीच निराश झाला नाही. सर्व उपचार यशस्वी पार पडल्यावर काही बोन मॅरो ट्रान्सप्लांटपूर्वी काही काळ तो घरीच होता. एकदा आमच्या अशाच काही उपक्रमात माझी सही हवी होती. आणखीनही काही लोकांच्या सह्या घ्यायच्या होत्या. मुकेश स्कूटर काढून माझ्या घरी आला. सह्या घेतल्या. मी नेमके तेव्हाच कॅन्सरवरील औषधांच्या किंमती यावरच कव्हर स्टोरी करत होतो. त्याबद्दल त्याला विचारणं प्रशस्त वाटत नव्हतं, पण विचारलं. कॅन्सरचा सामना केलेल्या त्याने मला त्या तशावेळी देखील फटाफट चारपाच जणांचे नंबर काढून दिले. त्या लोकांना फोन केला आणि सांगितले याला मदत करा. माणूस किती उत्साही असू शकतो याचेच ते उदाहरण होते.

सरतेशेवटी तोदेखील थोडासा थकला. पण न हरता पुढील उपचारांना सामोरे गेला. अखेरीस शरीरानेच साथ सोडली. गेला तेव्हा 58 वय होतं, पण अखेरपर्यंत अमर्यादित उत्साहानेच वावरला. आज त्याचे पार्थीव स्मशानात आले तेव्हा पाहताना गलबलून आलं. एरवी मी स्मशानातील सारे सोपस्कार करण्यात पुढे असतो, पण आज मला तो मुकेश पाहवत नव्हता. मनात जपलेला मुकेश असा पटकन कोठूनतरी येईल, ‘चल करुन टाकू हे काम’ असे म्हणेल असं सारखं वाटत होतं. पण आतातरी तो केवळ आठवणीतच राहीला आहे...
- सुहास जोशी
-----------------------------------------
वर मी मुकेशच्या गिर्यारोहण कारकिर्दीची वर्षानुसार  यादी दिलेली नाही. त्याच्याच बायोडेटामधून घेतलेली यादी येथे देत आहे.

1973-77    During schooling have been actively taking Part in Cricket, Football, Kabaddi, Malakhamb, Yoga,Baseball, Human Pyramid making(Manora) etc.  Also very active in folk dances presented cultural theme based programme like Maharashtra Darshan and Maharashtra Sana Darshan. Participated in school & college as a Volunteer in Family Planning Camp  organized by Dr.B N Purandare(1975) & Eye Camp organized by Sadguru Seva Sangh Trust , Mumbai(1979)
1976      Represented Maharashtra at National Integration Camp at Aizwal in Mizoram organised by NCERT Ministry of Education.
1984-88    Many Local treks in Sahyadris in and around Mumbai.
1986-89    Rendered services as Secretary NPC Employees co-operative Credit Society having 1500 members.
1989       Responsible for formation of YHAI Anushakti Unit as a founder member.               Participated as member in First Maiden expedition to the Peak 6181 near Kalindi khal in Gangotri Region Garhwal Himalayas under Anushakti unit.
1990       Founder Organising Committee member of “GIRISANCHAR”, All India Department of Atomic Energy Trekking Expeditions organized for around 250 members amongst the employees of Atomic energy on All India basis since 1990 every year. It has been organized in Maharashtra(20),Karnataka(3),Gujrath(2) and Madhya Pradesh(1) so far with unique distinction of not repeating trek route ever.
Completed Basic Mountaineering course with 'A' grade from Nehru Mountaineering     Institute, Uttarkashi.
1991      Expedition to Peak Deo Tibba (7001) in Manali region Of Himachal Pradesh.
1992   Completed Advanced Mountaineering course with 'A' grade from Nehru Mountaineering Institute, Uttarkashi.
*Formation of Brightlands Ganesh Utsav Mandal.Founder Secretary till date.
1993     * Trek to Annapoorna base camp in Nepal.
* Latur Earthquake Relief work through Department of Atomic Energy.
* Volunteering as a Camp leader In charge for Ashadhi  Edadashi Relief & Medical Camp organized by Bharat Sevashram  Sangha, Kolkata  at Pandharpur since its introduction in 1993.Participating with 15-20 Doctors and 60-70 Volunteers during the camp every year.
*Successfully  organised  AIDS Public awareness programmes in association with Maharashtra AIDS Control Society and Niramay Organisation, Solapur.
1994     Participation DAE Expedition to Kala Nag, Chhotanag, Barasukha as a Deputy Leader.
1995      Participated as a Leader for YHAI trek to Everest Base Camp 3 times.
1996-97   Everest Expedition announcements by Hrishikesh Yadav. Started actively involving in expedition preparation as a volunteer.
1997     Participated in Pre Everest Expedition to Bhagirathi-II and Baby Shivling.
1998     *Participated as Climbing Member in First Indian successful civilian Expedition to world’s highest Peak Mount Everest (Everest India 98) organised by Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh to celebrate Golden Jubilee of India’s Independence in May 1998. Reached the height of 25000 ft above North col.
*Conducted more than 500 slide shows on Everest Expedition to promote Trekking and Mountaineering, Love for the nature amongst Youth and students in view of success of the Everest expedition in Maharashtra, Gujrath, Goa and Karanataka.
2000     Appointed as a State Secretary and National Executive Member, Maharashtra State Branch of Youth Hostel Association of India An International Organisation. Around 3000 - 4000 trainees are participating every year for various trekking programmes organised by this organisation. Continuing in the post till date.
2000-05  Rendered services as Chairman NPC Employees co-operative Credit Society having 1500 members.
2006    Organized & participated in High Altitude Trekking Expeditions to Dibang Valley in Anini Region of Arunachal Pradesh at foots of Himalayas reached Aroopa Lake.
2000-10  Served as General Secretary of NPC Staff club. Successfully organised Kabaddi, Carrom, Football, Athletics, Chess, Ball Badminton and Drama Competitions on All India Basis on behalf of Dept. of Atomic Energy Sports & Cultural Council during the tenure. Also organized NPC Parivar Gathering for 2500 employees every year.
2011    Founder Secretary Yashasvi nagar Brightlands Kala Krida Mandal.Running Gymnasium and Library along with Study centre.
Actively Promoting North Eastern States of India for Tourism & Adventure activities, Specifically Assam, Arunachal & Meghalaya since 2003. Involved Involved in organising Mountain Biking from Guwahati to Tawang and Caving programmes in Meghalaya in 2012.

---समाप्त---


8 comments:

 1. Mukesh was my friend from 1978.really he was great man and friend also. When i know that he is no more, I feel very sad i can't believe it. May his soul Rezt in Peace.

  ReplyDelete
 2. Nice.person and great personality of NPCIL.RIP

  ReplyDelete
 3. Mukesh was my one of the best friend. In NPCIL he was most social person. I will remember him forever.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. मुकेश दादा गेले अजून विश्वास बसत नाही कोणी अस कस जावू शकतो
  वारीच्या आधी फोन केला होता तेव्हा म्हणाले पुढच्या वर्षी येतो तुमच्या बरोबर
  आजारी असले तरी सर्व लक्ष पंढरपूरला होत सर्व Volunteer जेवले का ड्यूटी वर् गेले का सारखा शरद दादाला फोन करायचे
  एक् स्वयंसेवक कसा असावा याच उत्तम उदाहरण मुकेश दादा नी त्यांच्या सेवेतून दाखवून दिले आमच्या साठी दादा एक् आदर्श व्यक्तीमत्त्व खंबीर नेतृत्व आणि उत्तम टीम लीडर कसा असावा याच उदाहरण होते , आहेत, आणि कायम राहतील
  भारत सेवाश्रम संघच्या पंढरपूर कैंप चा आधारस्तंभ आज ढासळला आहे
  ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगति देओ हीच पांडुरंग चरणी प्रार्थना������������

  ReplyDelete
 6. सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे मुकेश मैसेरी उत्तम उदाहरण होते.गिरीमित्र संमेलनात याचा अनुभव घेतला होता. परमेश्र्वर गतात्म्यास शांती देवो.

  ReplyDelete
 7. वाचून रडूच आले रे .... मुकेश नाही यावर आजून विश्वास नाही बसत .

  ReplyDelete
  Replies
  1. मुकेश भाई म्हणजे आम्हा सर्व ब्राईटलैण्डर्स साठी घरचेच. प्रत्येक सार्वजनिक कामात सर्वात पुढे. आणि आमच्या सोसायटीतील गणेशोत्सव म्हणजे त्यांचा जीव की प्राण.अश्या एका खंद्या कायर्यकर्त्याची उणीव कधीच भरून निघत नसते. झाले बहू होतील बहू परि या सम हा असं व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश भाई. त्यांच्या सारखीच सर्वाना मदत करण्या ची प्रवृत्ती आम्हा सर्वांच्या अंगी बाणावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
   मिलिंद गोडसे
   ब्राईटलैण्ड सोसायटी
   ठाणे

   Delete